शरद पवारांना कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवावे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले.
PRESS MEDIA LIVE : मुंबई :
मुंबई – कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्या पक्षाला एक सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला जावा आणि कॉंग्रेसचे अध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे सोपवले जावे, असे आठवले यांनी सुचवले आहे. काही दिवसांपूर्वी नेतृत्वाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस कार्यकारिणीची वादळी बैठक झाली. त्याआधी आणि नंतर कॉंग्रेसमध्ये घडलेल्या काही घडामोडींमुळे त्या पक्षाला नेतृत्वाच्या पेचाने ग्रासल्याचे चित्र निर्माण झाले. त्याचा संदर्भ घेऊन आठवले यांनी शनिवारी एक ट्विट केले.
कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या सोनिया आणि राहुल गांधी तयार नाहीत. त्यामुळे पवार यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवावे, असा अनपेक्षित पर्याय आठवले यांनी त्यातून सुचविला.
कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने काही दिवसांपूर्वी हंगामी अध्यक्षा असणाऱ्या सोनियांना एक पत्र पाठवले. त्यातून त्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची मागणी केली. त्यामुळे कॉंग्रेसचे नेतृत्व हा मोठ्या चर्चेचा विषय बनला.