कोल्हापूर सदैव माझ्या स्मरणात राहील.
पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख.
कोल्हापूर : पोलिस दल हीच माझी ताकद आहे. जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी व काळे धंदे मोडून काढण्यासाठी आम्ही पोलिसांचा संघ तयार केला. या संघाच्या माध्यमातून गुन्हेगारी व काळे धंदे मोडून काढता आले. त्याचे श्रेय माझ्या पोलिस दलाला जाते. भविष्यातही माझे पोलिस बांधव गुन्हेगारीला थारा देणार नाहीत, असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज व्यक्त केला. चांगले काम करणाऱ्यांना डोक्यावर घेणारे "कोल्हापूर' कायम माझ्या स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दोन वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर जिल्ह्याची पोलिस त्यांनी तेरा संघटित गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई केली. मटका, जुगार असे काळे धंदे मोडून काढले. सर्वसामान्यांच्या ह्दयात त्यांची "सिंघम स्टाईल' इमेज कोरली गेली. गुन्हेगारी वर्तुळ तर अक्षरश: भेदरून गेले. काल ( 17)
त्यांची पुणे ग्रामीणला बदली झाली. कोल्हापुरातून ते पुण्याला सोमवारी ( 21) रवाना होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, त्यांनी जिल्ह्यातील काम करताना आलेल्या अनुभवाचे गाठोडे आज खुले केले.
डॉ. देशमुख म्हणाले, ""जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारांसह व्हाईट कॉलर काळे धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्या तर कायदा सुव्यवस्थेचा फारसा प्रश्न उरत नाही. अशा संघटित गुन्हेगारांविरोधात आम्हीही आमच्या पोलिसांचा संघ तयार केला. या संघाच्या माध्यमातून विष्णोई, तेलनाडे, मुल्ला गॅंग विरोधात हात घातला. अमंली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळ्यात आम्हाला आम्हाला यश आले. जिल्ह्यातील पोलिसांचे चांगले नाव आहे. त्यांचा लोकांशी चांगला संपर्क आहे. त्याचा उपयोग आम्हाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी झाला. सरळ व स्वच्छ हेतूने काम करणाऱ्याला कोणाचाही दबाब येत नाही, हेही आम्हाला दिसून आले. चांगले काम करणाऱ्या संघातील पोलिसांना मी शाबासकी देण्याचा प्रयत्न केला. पण, चुकीचे काम करणाऱ्यांविरोधात मला कठोर भूमिकाही घ्यावी लागली.''
ते म्हणाले, ""प्रशासनाला मदत करण्याची भूमिका कोल्हापूरकरांची आहे. आम्ही एक पाऊल पुढे टाकले तर येथील लोक सहकार्यासाठी पाच पावले पुढे येतात. इथल्या लोकांना शहराबद्दल खूप स्वाभिमान आहे. चांगले काम करणाऱ्यांना येथील लोक डोक्यावर घेतात. त्याचाही अनुभव मी पोलिस प्रमुख या नात्याने घेतला. गडचिरोलीतून कोल्हापुरात बदली झाल्यानंतर मराठा आरक्षण, 2019 ची निवडणूक, महापूर, विधानसभा त्यापाठोपाठ आलेला कोरोना अशी एकापाठोपाठ एक आव्हानात्मक जबाबदाऱ्या पेलाव्या लागल्या. पण, या कामात संपूर्ण जिल्हा पोलिस टीम माझ्यासोबत असल्याने मला कधी एकटेपणा वाटला नाही.'' यावेळी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते.
देशमुखांची प्रांजळ कबुली...
महापूर, कोविड अशा आपत्तीजन्य परिस्थितीत दररोजच्या पोलिसिंगला ब्रेक लागला. पोलिस मुख्यालयातील प्रलंबित प्रश्न व पोलिसांसाठीचे घरकुलबाबत प्रयत्न केले. निधी अभावी पूर्णत्वाबाबत काही उणिवा राहील्या. पोलिस कल्याण निधीसाठी आवश्यक ते प्रयत्न केले. आणखी निधी वाढला पाहिजे. पाचगाव, शाहूवाडी, राधानगरी, आजरा येथे सीसीटीव्हीच्या योजना उभारल्या. त्याचे जाळे संपूर्ण जिल्ह्यात उभे करण्याचा संकल्प पूर्ण झाला नाही. शहरातील वाहतुकीच्या नियोजनासाठी 10 पॉईंटवर लक्ष केंद्रित केले होते. संभाजीनगर स्टॅंन्डचा प्रभावी वापर, रस्त्यावरील मार्केट, फेरीवाल्यांचे पुर्नवसन हे मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित येत असल्याने त्याचे नियोजन करता आले नसल्याची खंतही डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली. म्हणून धुरा सांभाळली.