जिल्ह्याच्या इतर भागात पावसाचा जोर कमी मात्र अतिवृष्टी सुरूच.

 जिल्ह्याच्या इतर भागात पावसाचा जोर कमी झाला.

               मात्र अतिवृष्टी सुरूच.

PRESS MEDIA LIVE :.  सांगली.

शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर वगळता जिल्ह्याच्या इतर भागात शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला. चांदोली परिसरात मात्र अतिवृष्टी सुरूच असल्याने वारणा धरणातील विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे या नदीकाठावर पुराचा धोका कायम आहे. मात्र कोयना, नवजा, महाबळेश्‍वर परिसरात पाऊस कमी झाल्याने आणि अलमट्टीचा विसर्ग वाढल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे तूर्त पुराचा धोका टळला आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे

गेल्या तीन-चार दिवसांत जोरदार पाऊस सुरू झाला आहे. सांगलीतही कृष्णेची पाणी पातळी वाढल्याने यंदा पूर येणार की काय अशी भीती होती.मात्र सकाळपासून कृष्णा नदीत पाणी पातळीत घट होत आहे. त्यामुळे पुराचा तूर्त धोका टळला आहे. दरम्यान सांगलीसह जिल्ह्याच्या विविध भागात दिवसभरात पावसाच्या सरी पडत होत्या. ऊन-सावल्याचाही खेळ सुरू होता. चांदोलीतून 6500 क्युसेक्स विसर्ग

वारणावती : चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर शुक्रवारीही कायम होता. सलग चौथ्या दिवशी येथे अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सांडव्यावरुन 5 हजार 100 व पॉवर हाऊस येथून 1 हजार 400 असा एकूण 6 हजार 500 क्युसेक्स इतका विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वारणेचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. धरणात सध्या 15 हजार 249 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.धरणात 29.05 टीएमसी पाणीसाठी आहे. ते 84.44 टक्के भरले आहे. शिराळा पश्चिम भागात काही ठिकाणी पावसाने थोडीफार उसंत घेतली असली तरी चांदोली परिसरात मात्र अतिवृष्टी सुरू होती. तालुक्यातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली आहेत. वीजपुरवठा खंडित झाला आहे.

शाहुवाडी व शिराळा तालुक्याला जोडणारा आरळा-शित्तूर पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post