पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासकच
PRESS MEDIA LIVE : पुणे : (प्रतिनिधी ) :
पुणे – जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपली त्या बारामती, पुरंदर, हवेली, दौंड, वेल्हे, आंबेगाव तालुक्यातील 130 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने आज काढले. यामध्ये विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 750 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले जाणार असून टप्प्याटप्याने त्यांचे आदेश काढले जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ग्रामपंचायतीवर राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याऐवजी सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने सरकारी अधिकाऱ्यांची उपलब्धता नसल्याचे कारण सांगितले होते. मात्र, उच्च न्यायालयाने अखेर सरकारी विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती कऱण्याचे आदेश राज्य सरकारला दिल्याने ग्रामविकास विभागाने ते मान्य केले. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांच्या इच्छेवर विरजण पडले आहे. पुणे जिल्ह्यात आजमितीला 750 ग्रामपंचायतीच्या मुदत टप्प्या टप्प्याने संपणार आहेत.