बुधवार पेठेतील दुकान मालकांचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बुधवार पेठ हॉट स्पॉट होऊ नये म्हणून कडक उपाययोजनांची मागणी.
PRESS MEDIA LIVE : पुणे :
अनलॉक प्रक्रिया आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लगबग वाढल्यानेबुधवार पेठ हॉट स्पॉट होऊ नये म्हणून कडक उपाययोजनांची मागणी करण्यासाठीबुधवार पेठेतील रेड लाईट वस्तीतील दुकान मालकांनी, व्यावसायिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची भेट घेऊन निवेदन दिले. बुधवार पेठ भागातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीतील व्यवहार सुरु झाल्याने या भागातील कोविड -19 हॉटस्पॉट बनण्याची शक्यता वाढू लागली आहे. या भेटीत शिष्टमंडळाने बुधवार पेठ कोविड हॉटस्पॉट होण्याच्या शक्यतेबद्दल त्यांच्या चिंता व्यक्त केल्या.
नगरसेवक विशाल धनकवडे, गजानन थरकुडे, शिवसेना संघटक गजानन पंडित, शहर इंटक उपाध्यक्ष योगेश भोकरे, महादेव कातुरे, शैलेश बढाई, ( गणेश मंडळ प्रतिनिधी ), दीपक हजारी, रुपेश पवार, सिध्दार्थ हेंद्रे, सत्यजित देसाई, राजेश बारणे, नितीन पंडीत, भोला वांजळे यांनी निवेदन दिले. गणेश मंडळ, व्यापारी संघटना प्रतिनिधि मीतेश कापडिया, दिनेश बढाई उपस्थित होते
व्यापार असोसिएशनने बुधवार पेठ मधील देहविक्री करणाऱ्या महिलांना ( सेक्स वर्कर ) लॉकडाऊनमुळे त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांना दिलासा देण्याची, परिसरातील व्यावसायिकांना , दुकानचालकांना कोरोना प्रादुर्भाव होऊ नये, याची उपाययोजना करण्याची विनंती केली.
देहविक्री करणाऱ्या महिलांना शासनाकडून मोफत अन्न -धान्य, औषधे, गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला जावा, बुधवार पेठेत निर्जुंतुकीकरण केले जावे, कोविड विषयक जागृती केली जावी, तपासणी केली जावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या भागात काम करणारी मंडळे, दुकानदार, संस्था शासनाला या संदर्भात मदत करतील, असे यावेळी सांगण्यात आले.
“बुधवार पेठेला ग्रीन झोनमध्ये ठेवण्यासाठी आम्ही नागरिक या नात्याने दुकानचालकांनी खूप मेहनत घेतली आहे. जेणेकरून आम्ही आपला व्यवसाय पुन्हा सुरू करू शकू. आमच्या सर्वांचे आधीच नुकसान झाले आहे. जर आता रेड लाईट क्षेत्र मोकळे झाले असेल आणि शहरातील विविध भागातून येणारे ग्राहक पुन्हा कोविड पसरविण्यास कारणीभूत ठरतील तर आम्हाला भीती आहे की हा परिसर एक हॉटस्पॉट बनू शकेल आणि आम्हाला पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनमध्ये जावे लागेल.
आम्ही व्यावसायिक पुन्हा लॉकडाऊन सहन करण्यास सक्षम नाही, अशा भावना शिष्टमंडळाने व्यक्त केल्या.
हे निवेदन पालकमंत्री अजित पवार, आमदार मुक्ता टिळक, जिल्हाधिकारी राहुल देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त, महापौर मुरलीधर मोहोळ.यांनाही पाठविण्यात आले आहे. 400 हून अधिक व्यापारी मालक आणि स्थानिक राजकीय प्रतिनिधींनी त्यावर स्वाक्षरी केली आहे.
तथापि, रेड लाईट क्षेत्रात अनलॉक नंतर व्यवसाय पुन्हा सुरू झाला आणि अनलॉक झाल्याच्या दिवसातच बुधवार पेठ रेड लाईट क्षेत्रात कोविड मध्ये देहविक्री करणाऱ्या महिला ( सेक्स वर्कर ) आणि एका ग्राहकासह 5 जणांची कोविड चाचणी सकारात्मक आली.
“आमचा विश्वास आहे की पुण्यात कोविड प्रकरणे अजूनही वाढत असताना अशा प्रकारच्या निकट संपर्क आणि जोखमीच्या व्यवसायावर बंदी घातली जावी हे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले पाहिजे. तसेच, जास्तीत जास्त लोकांना संसर्ग होण्यापूर्वी तपासणी करणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही जिल्हा प्रशासनाला भेटून आमचे प्रश्न मांडले. त्यांनी आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि लवकरच या विषयात तोडगा काढला जाईल , ”असे भोला वांजळे यांनी शिष्टमंडळाच्या वतीने सांगीतले. हे पत्र सादर करण्यापूर्वी त्यांनी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांसमवेत या विषयावर चर्चा केली आहे.
या भागात पर्यायी दिलासा आणि जलद चाचणी घेण्याची आवश्यकता असल्याचे मान्य करीत बुधवारपेठ भागातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. मॅथ्यू यांनी सांगितले की, “ बहुतेक देहविक्री करणाऱ्या महिला ( सेक्स वर्कर ) कोविड दरम्यान व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास घाबरत आहेत. पण त्यांच्याकडे दुसरा पर्यायी पर्याय नसल्यामुळे,पुन्हा काम सुरू करण्यास भाग पाडले गेले आहे. जर त्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळाला तर त्यांना सुरक्षित वाटेपर्यंत त्या आपला व्यवसाय बंद ठेऊ शकतील. ”
जिल्हा प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन तोडगा काढेल, अशी अपेक्षा व्यावसायिकांना आहे.