भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा 'अटल रँकिंग'मध्ये देशात
पहिल्या ५० महाविद्यालयात समावेश
PRESS MEDIA LIVE : पुणे :
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा केंद्रीय शिक्षण खात्याच्या 'अटल रँकिंग' मध्ये,खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या श्रेणीत देशात पहिल्या ५० अभियांत्रिकी महाविद्यालयात समावेश झाला आहे.'भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय ' (पुणे ) चे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
'अटल रँकिंग ऑफ इन्स्टीट्युशन्स ऑन इनोव्हेटिव्ह अचिव्हमेंट्स (अरिया)हे रँकिंग केंद्रीय शिक्षण खात्याने नाविन्यपूर्ण निकषांखाली केलेले मानांकन आहे. उपलब्ध निधीतून केलेले नाविन्यपूर्ण अध्यापन,इन हाऊस स्टार्ट अप,नाविन्यपूर्ण कल्पना ,उद्योजकता,तंत्रज्ञान हस्तांतर,प्रशासन,पायाभूत सुविधा,गुणवत्तापूर्ण अध्यापन,अभ्यासक्रम अशा अनेक निकषांवर देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे मानांकन करण्यात आले आहे.६७४ महाविद्यालयांनी या मानांकन प्रक्रियेत भाग घेतला. या मानांकन प्रक्रियेचे हे दुसरे वर्ष आहे.
डॉ आनंद भालेराव म्हणाले'उपलब्ध निधी आणि साधनामधून आम्ही मागील शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण कल्पना आणि स्टार्ट अप उपक्रमांना प्रोत्साहन दिले.उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना पुढे नेणारे ४४ राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम आयोजित केले. कार्यशाळा,स्पर्धा,समस्या समाधान विषयक उपक्रम,बौद्धिक स्वामित्व हक्क तसेच पेटंट विषयक उपक्रम आयोजित केले.राष्ट्रीय स्तरावरील अशा १४ उपक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभावी प्रतिनिधित्व केले.महाविद्यालयाने २ पेटंट मिळवली,३१ पेटंट साठी अर्ज केले आणि २७ पेटंट संबंधित व्यासपीठांवर प्रकाशित झाली.
'उद्योजकतेला वाव देणारे इन्क्युबेशन सुविधा आम्ही निर्माण केल्या.त्यासाठी भरीव निधी महाविद्यालयाने प्रयत्नपूर्वक मिळविला.
महाविद्यालयाने आयोजित केलेली 'आयडिया कॉम्पीटिशन' देशभर गाजली.अशा सर्व सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे डॉ.आनंद भालेराव यांनी सांगितले