Pimpri : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वावडे.

 सत्ताधारी भाजपला उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वावडे.

PRESS MEDIA LIVE. :  पिंपरी :

 पिंपरी – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवार यांनी करोना काळात शहरात दोन वेळा दौरे करत महापालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. हे दोन्ही दौरे त्यांनी प्रशासकीय पातळीवर केल्यानंतरही महापालिकेतील एकही भाजप नेता पवारांच्या आजूबाजूलाही न फिरकल्यामुळे सत्ताधाऱ्यांना अजित पवारांचे वावडे असल्याचेच समोर आले आहे

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर तब्बल 15 वर्षे राष्ट्रवादी अर्थात अजित पवार यांनी एकहाती सत्ता गाजविली. सन 2014 साली राज्यातील सत्ता गेल्यानंतरही शहर पातळीवरीलही अनेकांनी सत्तांतर करत भाजपामध्ये प्रवेश केला. पूर्वीची राष्ट्रवादीचीच असलेली बहुतांश टिम महापालिकेच्या 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाकडून उतरल्याने राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. यानंतरही लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनाही पराभवाचा सामना करावा लागल्याने पवारांच्या हातून पिंपरी-चिंचवड निसटल्याची चर्चा रंगली होती.

मात्र, अनपेक्षित घडामोडीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. दरम्यान करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दीड महिन्यापूर्वी अजित पवार यांनी महापालिकेत येऊन प्रशासनाने चालविलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आल्यानंतर त्यावेळीही भाजपाचा एकही पदाधिकारी पालिकेकडे फिरकला नव्हता. तर दोनच दिवसांपूर्वी अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या कोविड हॉस्पिटलच्या कामाची पाहणी अजित पवार यांनी केली होती. या दौऱ्या दरम्यानही भाजपाचा एकही पदाधिकारी फिरकला नाही.  राज्य शासनातील कोणताही मंत्री शहर दौऱ्यावर असताना तसेच स्थानिक सत्ताधारी कामकाजाबाबत माहिती देतात अथवा चर्चा करतात मात्र महाविकास आघाडीचे सरकार मदत करत नसल्याची आवई उठविणारा एकही नेता अथवा पदाधिकाऱ्याने साध्या समस्याही न मांडल्यामुळे करोना महामारीपेक्षा पक्षीय राजकारणच अधिक महत्त्वाचे ठरल्याचे मानले जात आहे.

                  समस्या महत्त्वाच्या

सत्ता कोणाचीही असली तरी राज्य शासनाकडून मदत मिळणे अपेक्षित आहे. शहरातील करोनाची समस्या उग्र बनत चालली आहे. शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी अजित पवार हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात याची जाणीव असतानाही केवळ राजकीय द्वेषातून सत्ताधाऱ्यांची भूमिका सर्वांनाच आश्‍चर्यचकीत करणारी ठरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post