मिरज. जनावरांसह कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी


जनावरांसह कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर वेगाने सुरू




PRESS MEDIA LIVE :. मिरज :

       मिरज : कृष्णाघाटावर कृष्णेची पाणीपातळी आज 48     फुटांवर गेली. शेतातील वस्त्यांत पाणी शिरल्यामुळे आज दिवसभर येथील शेतकऱ्यांनी जनावरे मिरज शहरात सुरक्षित स्थळी हलवून कुटुंबांचेही स्थलांतर वेगाने सुरू केले.

दरम्यान, परिस्थितीची पाहणी मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपसिंह गिल, मिरजेचे तहसीलदार रणजित देसाई, शिरोळच्या तहसीलदार अपर्णा  मोरे-धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे, महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी केली. जिल्हा बंदीच्या अनुषंगाने पुरस्थिती पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना स्थलांतरासाठी सांगली येथे तर सांगली येतील नागरिकांना कोल्हापूर येथे स्थलांतरासाठी सोडण्याचे आदेश दिले.

 सध्या कृष्णा घाटावरील आठ पैकी एक बुरुज शिल्लक आहे. कोयनेतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वारणा धरणातूनदेखील विसर्ग सुरू असल्याने दिवसभरात पाणी पातळीत दहा फुटांनी वाढ झाली. कोयना धरण परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. रात्री 40 फुटांवर असलेली पातळी सायंकाळपर्यंत 48 फुटांवर गेली. दिवसभरात आठ फुटांनी पाणी पातळी वाढली आहे.

गतवर्षी महापुराने कृष्णाघाट परिसरात हाहाकार माजला होता. दहा दिवस कृष्णाघाट परिसर पाण्याखाली होता. यंदादेखील सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णाघाट परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले. त्यामुळे कृष्णाघाट परिसरातील नागरिकांचे डोळे पाणी पातळीकडे आहेत. पुरस्थितीत जिल्हाबंदी नाही

पुराच्या पाणी पातळी वाढ होत आहे हे लक्षात घेऊन कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हाबंदी उठवण्यात आल्याचे इचलकरंजी व मिरजेच्या प्रांताधिका-यांनी जाहीर केले. अर्जुनवाड कृष्णाघाट येथील नागरिकांना स्थलांतराच्या अनुषंगाने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील नातेवाईकांकडे जाण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे या ठिकाणी जिल्हा बंदी आदेश लागू राहणार नाही..

प्राधान्याने स्थलांतर

गतवर्षी पुरात अनेक जनावरे वाहून गेल्यामुळे यंदा नागरिकांनी जनावरांचं स्थलांतर आत्ताच सुरू केले आहे. पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने कुटुंबाच्या स्थलांतराचाही आढावा अधिका-यांनी घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post