परिवर्तनाचा लढा व्यापक दिशेने पुढे नेणे हीच शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर व शहीद कॉ. गोविंद पानसरे यांना खरी आदरांजली.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :
शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला आज सात वर्षे पूर्ण झाली.डॉ.दाभोळकरांच्या खुनानंतर अगदी त्वरित मी समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या " प्रबोधन प्रकाशन ज्योती "मासिकासाठी एक पन्नास पानी दीर्घ लेख लिहिला होता.तो लेख समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व तत्कालीन उपाध्यक्ष कॉ.गोविंद पानसरे यांना अतिशय भावला होता. तो दीर्घ लेख आणखी सर्वदूर जावा व कार्यकर्त्यांचे प्रबोधन व्हावे या हेतूने कॉ.पानसरे यांनी त्या लेखाची " सनातनी विकृती आणि विवेकी संस्कृती "या नावाने पुस्तिका तयार केली. त्याला स्वतः प्रस्तावना लिहून श्रमिक प्रतिष्ठान ,कोल्हापूरच्या वतीने ती प्रकाशितही केली. शहीद डॉ. दाभोळकर यांच्या खुनानंतर पहिल्या मासिक स्मृतिदिनी अंनिसचे कार्याध्यक्ष मा.अविनाश पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात त्याचे प्रकाशनही झाले. त्यानंतर कॉ.पानसरे आणि मी दोघांनी मिळून या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. मी वक्ता आणि पानसरेकाका अध्यक्ष अशी ही व्याख्याने होत होती. विवेकवादी विचार रुजवण्यासाठी आणि सनातनी विकृतीची भांडाफोड करण्यासाठी ही व्याख्यानरुपी खास प्रबोधन मोहीम चळवळ बळकट करण्यासाठी उपयोगी ठरली होती,ठरत होती.अशा वेळी त्याचं विकृतीने कॉ.गोविंद पानसरे व उमाताई पानसरे यांच्यावर भ्याड खुनी हल्ला केला.त्यात लढवय्या नेता असलेले कॉ. पानसरे शहीद झाले. आज कॉ.पानसरे यांचीही तीव्रतेने आठवण होत आहे. एकीकडे खुनशी ,विकृत विचारधारा वाढत आहेत हे कटू वास्तव आहे.व्यवस्था बदलाचे समाजकारण, राजकारण,संस्कृतीकारण करणारी समग्रतेचे भान असणारी त्यांची विचारधारा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे.ते काम परिवर्तनवादी,पुरोगामी,डाव्या,विवेकवादी चळवळीतील आपण सारेजण करत आहोतच.त्याची गती वाढवणे व समग्र परिवर्तनाचा लढा व्यापक दिशेने पुढे नेणे हीच शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर व शहीद कॉ.गोविंद पानसरे यांना खरी आदरांजली ठरणार आहे.खुनांच्या तपासातील निष्क्रियतेला वैचारिक सक्रियता वाढवूनच उत्तर देता येऊ शकते. तो निधडेपणा दाखवत पुढे जाणे यातच शहिदांच्या शहीदत्वाला सलाम ठरत असतो. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन..