साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

साहित्य सम्राट- अण्णाभाऊ साठे.

_लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी  विशेष लेख_

 -लेखक डॉ. विकास पाटील,सैनिक टाकळी (कोल्हापूर).



PRESS MEDIA LIVE. :

अण्णाभाऊंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) या ठिकाणी झाला. घरची परिस्थिती प्रतिकूल होती. तरीही आई-वडिलांनी वयाच्या सातव्या वर्षी अण्णाभाऊंना शाळेत दाखल केले. ज्या दिवशी शाळेमध्ये घातले, त्यादिवशी दुपारी कुलकर्णी मास्तरांनी अण्णाभाऊंना बेदम मारले. त्यादिवशी दुपारीच अण्णाभाऊ घरी आले. ते परत कधी शाळेत गेलेच नाहीत. त्यांच्या जीवनात अर्ध्या दिवसाची शाळा वाट्याला आली. अण्णाभाऊंनी ८० कथा-  कादंबऱ्या, ८ महानाट्य, लोकनाट्य, पोवाडे, "माझा रशियाचा प्रवास" हे प्रवासवर्णन, इत्यादी साहित्य निर्माण केले. त्यांच्या कादंबरीवर आधारित "वारणेचा वाघ, फकीरा, डोंगरची मैना," इत्यादी चित्रपट निर्माण झाले. साहित्यसम्राट अण्णाभाऊ जागतिक कीर्तीचे साहित्यिक होते.
            अण्णाभाऊंच्या वाट्याला खूप दुःख होते. दारिद्र्य होते. घरी खायला अन्न नव्हते. पण नशीब आजमावावे म्हणून ते  वाटेगावहून निघाले. वयाच्या अकराव्या वर्षी वाटेगाव सोडून मुंबईला आले. मुंबईला येण्यासाठी तिकिटाला पैसे नव्हते. पायात चप्पल नव्हते. अनवाणी सतत एक महिना प्रवास करून मुंबईला आले. त्या ठिकाणी ते माटुंगा-लेवा कँपात पोहोचले. गिरणी कामगार म्हणून उदयाला आले. पण गिरणीमध्ये येण्यापूर्वी त्यांनी तयार कपडे गावागावांमध्ये, घराघरांमध्ये जाऊन रस्त्यावरती विकले. "फेरीवाले" म्हणून त्यांनी काम केले. मुंबईत फिरताना दुकानाचे फलक ते वाचायचे, आणि घरी येऊन सराव करायचे. अक्षरे गिरवायचे. त्यांनी स्वतः शिक्षण घेतले.

त्यांचे मूळ नाव तुकाराम साठे. त्यांनी परिवर्तनाचे, प्रबोधनाचे काम केले. महाराष्ट्राची चळवळ, स्वातंत्र्याचा लढा इत्यादी ११ पोवाडे प्रचंड गाजले. संयुक्त महाराष्ट्राचे अण्णाभाऊ एक निर्माते आहेत. छत्रपती शिवराय, क्रांतीबा फुले,छ.शाहूजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कार्ये गावागावात पोहोचविले. त्यांचा "स्टॅलिन ग्रामचा लढा"हा पोवाडा देशासह रशियामध्ये खूप गाजला. त्याचे रशियन भाषेमध्ये अनुवाद झाल्याचे  खुद्द त्यांना देखील माहीत नव्हते. तो रशिया मध्ये घराघरात वाचला जाऊ लागला. शाळेत पोवाड्यानंतर शाळा सुरू व्हायची. तेथील लोकांना अण्णाभाऊ आपले वाटले. त्यांनी अण्णाभाऊंना रशियाला येण्याचे  आवतन दिले. ज्यांना वयाच्या अकराव्या वर्षी वाटेगाव हून मुंबईला येण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत, ते विमानात बसून रशियाला गेले. त्यांचा "मॉस्कोच्या चौकात" वीस लाख लोकांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अण्णाभाऊ म्हणाले," माझ्या देशांमध्ये दीनदलितांना, दीनदुबळ्यांना हक्क आणि अधिकार देणारा एक छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. त्यांच्यामुळे मी येथे आलो आहे". त्यांनी तेथे शिवचरित्र सांगितले. रशियन लोक भारावले. त्यांनी रशियन साहित्यिक प्रा. चेलीशेव यांना शिवचरित्र सांगितले. त्यांनी ते रशियन भाषेमध्ये अनुवादित केले. रशियनांना अण्णाभाऊमुळे खरे शिवचरित्र समजले. रशियन लोकांकडून अण्णाभाऊंचे कार्य पंडित नेहरूंना रशियात समजले. तेथे नेहरूंनी घोषणा केली की, मी मुंबईला गेल्यानंतर प्रथम अण्णाभाऊंना भेटण्यासाठी बोलावून घेईन. त्यावेळी अण्णाभाऊ म्हणाले, नेहरूंनी बोलावले तरी, मी जाणार नाही. त्यांना गरज असेल तर, त्यांनी माझ्याकडे यावे. अशा स्वाभिमानी साहित्यिकांची आज बहुजन समाजाला गरज आहे.

२ मार्च १९५८ रोजी मुंबईत झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या नावावर अनेक जण लक्षाधीश झाले. १८ जुलै १९६९ या दिवशी अण्णाभाऊंचे निधन झाले. त्यादिवशी त्यांच्या कादंबरीवर आधारित निर्माण झालेले चार चित्रपट मुंबईमध्ये हाऊसफुल्ल झाले. पण त्यांच्या अंत्यविधीसाठी पैसे नव्हते. भाई माधवराव बागल यांच्यासह अनेक मराठा, मातंग, माळी, धनगर, सत्यशोधक कार्यकर्ते एकत्र जमून निधी गोळा करून, त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
*शासनाने आण्णाभाऊंचा जन्मदिन- १ ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करावा.* अशा या साहित्यसम्राट अण्णाभाऊंना त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांचा मानाचा मुजरा!


*डॉ.विकास पाटील,*
*महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषद,*
*केंद्र संचालक,छ.शंभूराजे आधार व्यसनमुक्ती-मधुमेह मुक्ती मार्गदर्शन केंद्र,सैनिक टाकळी.*
*भ्रमणध्वनी-*
9881172889,
9172672889.

Post a Comment

Previous Post Next Post