डॉ. नायडू रुग्णालयाचे अखेर होणार स्थलांतर.
PRESS MEDIA LIVE : पुणे : (मोहम्मद जावेद मौला ):
पुणे – महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाचे स्थलांतर होणार आहे. या रुग्णालयासाठी महापालिकेकडून जागा पाहणी सुरू आहे. शहरातील सर्वसामान्य रुग्णांवरील उपचारासाठी रुग्णालयासोबतच प्रशिक्षित स्टाफही नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या वतीने उपलब्ध करून येणार आहे. सध्याच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेवर सुमारे 500 बेड्सचे हे महाविद्यालय होणार असले, तरी मागील 100 वर्षांत प्लेग, सार्स, स्वाइन फ्लू आणि सध्याच्या करोनासारख्या संसर्गजन्य रोगांच्या साथीमध्ये वरदायी ठरलेले आणि शंभर वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे हे सांसर्गिक रुग्णालय मात्र येथून हलवावे लागणार आहे.
डॉ. नायडू रुग्णालय आणि परिसरातील सुमारे 20 एकर हून अधिक जागेमध्ये महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी मागील आठ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. डॉ. नायडू रुग्णालय स्थलांतरित करण्यासाठी उपनगरामध्ये जागेचा शोध सुरू आहे. हे रुग्णालय शहराबाहेर उपनगरांत होण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.