कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव या मुळे प्रशासना कडून प्रतिबंधात्मक आदेश जारी . सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास जिल्हा दंडाधिकारी दौलत देसाई यांनी प्रतिबंध केला आहे.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : (मनु फरास) :
इचलकरंजी नगरपरिषद क्षेत्रातील कुडचेमळा, दातारमळा, काडापुरे तळ, बाळ नगर, जुना चंदूर रोड, गुरुकन्नननगर, बोंगाळे गल्ली, त्रिशुल चौक, कलानगर, रिंग रोड, गोकूळ चौक या भागामध्ये कोरोना संसर्गात रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये काही व्यक्तींना बाधित क्षेत्रात प्रवास केल्याचा इतिहास नाही. परंतु, असे असूनही स्थानिक बाधित व्यक्तीमार्फत संसर्ग होऊन स्थानिक प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नगरपरिषद हद्दीत आज अखेर एकूण ३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूही झालेला आहे. इचलकरंजी मध्ये फार मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग व त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग आहे. तसेच दररोज रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीही मोठ्या प्रमाणावर आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गावर नियंत्रण न ठेवल्यास त्याचा दुष्परिणाम रुग्ण संख्या वाढण्याचा व समूह संसर्ग होण्याचा धोका संभवत आहे. त्यामुळे इचलकरंजी नगरपरिषद व परिसरातील नागरिकांच्या हालचाली व सार्वजनिक ठिकाणी नागरिक समुहाने एकत्र येण्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार इचलकरंजी नगरपरिषद क्षेत्र, शहापूर, कबनूर, चंदूर, तारदाळ, खोतवाडी, या क्षेत्रामध्ये दि. ४ ते १३ जुलै २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत खालील प्रमाणे काही बाबी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. पाच पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
नगरपरिषद हद्दीतील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या अनावश्यक हालचाली प्रतिबंधित करण्यात येत आहेत. नागरिकांना अत्यावश्यक कारणे किंवा उद्योग व्यवसायाच्या कारणाव्यतिरिक्त एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. हा प्रतिबंध नगरपरिषद हद्दी नजीकच्या या आदेशात नमूद गावांच्या सीमांनाही लागू राहील. अशा गावातील नागरिकांच्या अनावश्यक हालचाली प्रतिबंधित करण्यात येत आहेत. या गावांतील नागरिकांना अत्यावश्यक किंवा उद्योग-व्यवसायाच्या कारणाव्यतिरिक्त एका गावातून दुसऱ्या गावामध्ये किंवा इचलकरंजी नगरपरिषद हद्दीमध्ये जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.मोर्चे, सभा, आंदोलने प्रतिबंधित करण्यात येत आहेत. पाच पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून निवेदन देण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
लग्न, मुंज, साखरपुडा, वाढदिवस इ. सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, समारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमास प्रतिबंध करण्यात येत आहे.
केश कर्तनालये, स्पा, सलूनस्, ब्युटी पार्लर्स इ. आस्थापना सुरु ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
ऑटो रिक्षा, काळी पिवळी, टेंपो ट्रॅव्हलर इ, प्रवासी वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
रस्त्यावरील हातगाडीवर खाद्यपदार्थ किंवा इतर सर्व प्रकारची उघड्यावरील व रस्त्यावर विक्री प्रतिबंधित करण्यात येत आहे. (यामध्ये भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू यांना सूट असेल. परंतु, यावर स्थानिक स्वराज्य संस्थेचे निर्बंध लागू राहतील.)
हा प्रतिबंधित आदेश लागू असणाऱ्या क्षेत्रातील सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे व दुकाने किंवा इतर ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक करण्यात येत आहे.
या प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व व्यापारी, औद्योगिक व इतर आस्थापनांनी त्यांचे नियमित कर्मचारी संख्येच्या ५०% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आस्थापनेत / कामावर उपस्थित ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे आस्थापनेत निर्जंतुकीकरण,मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे इ. संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक बाबी करण्यांचे बंधन संबधित आस्थापनेवर घालण्यात येत आहे.
सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक/ प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना शैक्षणिक कामकाज करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. (शिक्षणेत्तर कामकाज उदा, ई-सामुग्री विकास, उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन आणि निकाल जाहीर करणे इ.वगळून)
सर्व आतिथ्य सेवा सुविधा (गृहनिर्माण सेवा / पोलीस/ सरकारी अधिकारी/ आरोग्यसेवा कर्मचारी / पर्यटकांसह अडकलेल्या व्यक्ती यांच्या साठी आणि अलगीकरणासाठी वापरल्या गेलेल्या वगळून.) प्रतिबंधित असेल. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे आणि सभागृहे.असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधित असतील. (अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू व वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना वगळून.)
सर्व सामाजिक / राजकीय / क्रीडा/करमणूक/ शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे ही नागरिकांकरिता बंद ठेवली जातील तसेच असे धार्मिक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
जीवनावश्यक वस्तू व आरोग्याची कारणे वगळून ६५ वर्षावरील व्यक्ती, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती स्त्रीया व दहा वर्षा खालील मुले यांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
अत्यावश्यक नसणाऱ्या कारणांसाठी नागरिकांची व अत्यावश्यक व जीवनावश्यक वैद्यकीय सेवा व्यतिरिक्त इतर वाहनांची जिल्ह्यांतर्गत हालचाल रात्री ९ ते पहाटे ५ वा. या कालावधित प्रतिबंधित असेल.
अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व मार्केट व दुकाने सकाळी ९ वा. पूर्वी व सायंकाळी ५ या. नंतर चालू ठेवता येणार नाहीत. एखाद्या ठिकाणी गर्दी होवून सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात येतील.
सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू, सुपारी खाणे व थुंकण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही करणासाठी या क्षेत्रातील लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
यापूर्वी उपविभागीय दंडाधिकारी यांनी कन्टेनमेंट क्षेत्र जाहीर करण्याबाबत दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही सुरू राहील. या आदेशाने प्रतिबंधित केलेल्या बाबी व्यतिरिक्त उर्वरीत बाबींना शासनाकडील व जिल्हादंडाधिकारी यांच्याकडील यापूर्वीचे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. या प्रतिबंधित आदेशाच्या कालावधित कोरोना संसर्ग जादा आहे व सामूहिक संसर्गाचा धोका वाढत आहे असे निदर्शनास आल्यास प्रतिबंधित आदेशाची व्याप्ती व कालावधी वाढविण्यात येईल.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) याच्या कलम१८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी देसाई यांनी दिला आहे. येत नाही.
Tags
Latest News