लाचखोर तलाठ्यासह दोघेही लाचलुचपतच्या जाळ्यात.
लाचखोर तलाठी आणि एका वाहनचालकाला लाच घेताना प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. शेतातील कुपनलिकेची सातबारावर नोंदणी करण्यासाठी लाच घेणाऱ्या तलाठी एसीबीच्या सापळ्यात अडकला . शुक्रवारी (ता. १९) वेगवेगळ्या दोन घटनांत दोन लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. सीपीआरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २५ हजार रुपये घेणारा वाहनचालक राहुल प्रल्हाद बट्टेवार (वय ३८, रा. कसबा बावडा) आणि हुपरी येथे शेतातील कुपनलिकेची सातबारावर नोंदणी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणारा तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने (४०, रा. जयसिंगपूर) या दोघांनाही एसीबीने अटक केली.
करोना संसर्गाच्या काळात सरकारी कार्यालये बंद असल्याने लाचखोरीच्या घटना थांबल्या होत्या. आता सरकारी कार्यालयांमधील कामकाज पुन्हा सुरू होताच लाचखोरीचे प्रकारही सुरू झाले आहेत. कोल्हापुरात एकाच दिवशी दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले. सीपीआर रुग्णालयात कंत्राटी वाहनचालक पदावर काम करणारा राहुल बट्टेवार याने सीपीआरमध्ये कायमस्वरुपी नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. बट्टेवार याच्याबद्दल शंका आल्याने तरुणाने एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यानुसार शुक्रवारी दुपारी सीपीआरच्या आवारातच सापळा रचून लाचेतील रकमेचा २५ हजारांचा पहिला हप्ता घेताना बट्टेवार याला एसीबीच्या पथकाने अटक केली. हुपरी येथील तलाठी कल्लाप्पा शेरखाने याने एका शेतकऱ्याकडे त्याच्या सातबारा उताऱ्यावर कुपनलिकेची नोंद करण्यासाठी तीन हजारांची लाच मागितली होती. यातील दोन हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने तलाठी शेरखाने याला शुक्रवारी दुपारी हुपरी येथील तलाठी कार्यालयात अटक केली. दोन्ही लाचखोरांना अटक झाली असून, त्यांच्या घरांची झडती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती एसीबीचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.
Tags
Latest News