शरद पवार यांनी दिलेल्या ऑफर राजू शेट्टी यांनी स्वीकारली.
दोन दशकांपूर्वी शरद पवार यांना अंगावर घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपाने राज्यात शेतकऱयांची चळवळ उभी करणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी अखेर मंगळवार राष्ट्रवादीकडून आलेला विधान परिषदेच्या आमदारकीचा प्रस्ताव स्वीकारला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर शेट्टी यांची महत्वपूर्ण बैठक बारामतीतील गोविंदबागेत झाली. त्यामध्ये पवार यांनी दिलेली ऑफर शेट्टी यांनी स्वीकारली. त्यामुळे राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेतील जागेवर शेट्टी यांच्या निवड निश्चित मानली जात आहे. गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना विधानपरिषदेच्या आमदारकीचा प्रस्ताव दिला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार मंत्री पाटील यांनी शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना निरोप दिला होता. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेश कार्यकारीणीच्या सदस्यांची मते आजमावून घेतल्यानंतर शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शेतकऱयांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी ताकदीचा नेता म्हणून शेट्टीच प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे त्यांनीच विधानपरिषदेवरील आमदारकी स्वीकारावी, अशी मते स्वाभिमानीच्या प्रदेश कार्यकारिणीतील सदस्यांनी व्यक्त केल्यानंतर शेट्टी यांचा मार्ग सुकर झाल्याचे सांगण्यात आले.
बारामतीत महत्वपूर्ण बैठक
ज्येष्ठ नेते शरद पवार कोकण दौऱयावर असल्याने शेट्टी यांची त्यांच्याशी होणारी बैठक लांबणीवर पडली होती. पवार कोकण दौऱयावरून परतल्यानंतर मंगळवारी शेट्टी बारामतीला रवाना झाले. बारामतीतील शरद पवार यांची गोविंदबाग प्रसिद्ध आहे. गोविंदबागेत पवार-शेट्टी यांच्यात बैठक झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, स्वाभिमानीचे स्थानिक नेते सतीश काकडे, राजेंद्र ढवाण उपस्थित होते. पवार यांनी चर्चेपूर्वी शेट्टी यांना गोविंदबाग दाखविली. त्यातील शेतीविषयक केलेले विविध प्रयोग, उपक्रम दाखविले. त्यानंतर दोघांत चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या कोटय़ातून विधानपरिषदेवर जाण्यास शेट्टी यांनी होकार दिला.
Tags
Rajkiya