शंकर (नाना )हळदणकर यांची विधान परिषदेवर नियुक्ती करा
_अखिल भारतीय भंडारी समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…_
,PRESS MEDIA LIVE : ता. १४ : महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर राज्यपालांच्यावतीने विविध क्षेत्रातील १२ मान्यवरांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणुक होणार आहे. त्यासाठी मुंबईतील उद्योजक आणि भंडारी मंडळ दादरचे विश्वस्त शंकर उर्फ नाना हळदणकर यांचे सहकार, शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील काम आणि अनुभव लक्षात घेऊन अखिल भंडारी समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी अखिल भारतीय भंडारी समाजाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. अशी माहिती भंडारी महासंघाचे सल्लागार व भंडारी समाज सुकाणू समिती सदस्य गुरुनाथ मिठबावकर यांनी दिली आहे.
भंडारी महासंघाचे सल्लागार गुरुनाथ मिठबावकर म्हणाले, बहुसंख्य भंडारी समाज हा भारताच्या सागर किनारपट्टीवर म्हणजेच महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू राज्यातून व विषेशतः मुंबई आणि कोकणात मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. या समाजाने नेहमीच शिवसेनेची पाठराखण केली आहे. त्याच समाजाचे नेते नाना हळदणकर यांनी भंडारी समाजासाठी गेली अनेक वर्षे काम केले आहे. भंडारी समाज संघटीत करण्यासाठी गेली अनेक वर्ष निरनिराळ्या ठिकाणी महामेळावा, महाअधिवेशन, महास्नेहसंमेलन, निरनिराळ्या जिल्ह्यात विद्यार्थी गुणगौरव समारंभ आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात त्यांनी राबविले आहेत. तसेच भंडारी समाजाच्या विविध संघटनेच्या कार्यात त्यांचा सहभाग असतो. भंडारी को. ऑप. बँकेवर प्रशासक म्हणुन त्यांनी काम केले आहे. बॉम्बे प्लॉट ओनर असोसिएशनच्या मार्फत मुंबईत सहकारासंबंधी सहकार सोमिनार आयोजित करून जनजागृती व सहकार चळवळ वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. को. ऑप. बँकासंबंधीच्या चळवळीत ते सातत्याने मार्गदर्शन करीत आहेत.
मुंबई आणि कोकणात जिम्नेशियम, शरीर शौष्टव स्पर्धा, शारीरीक क्रीडा स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा आदी स्पर्धा मोठ्या प्रमाणात राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे आणि त्यांच्या आरोग्य विषयक कॅम्पचे आयोजन केले आहे. होतकरू विद्यार्थी, आय.ए.एस., आय.पी.एस. व्हावे म्हणन मोठ्या प्रमाणात स्पर्धा परिक्षांचे/सेमिनारचे आयोजन केले आहे. महिलांना स्वयंरोजगार आणि प्रशिक्षण सहकारातून समृद्धीकडे घेऊन जाण्याचे उपक्रम त्यांनी राबविले आहेत. अनेक तरुणांना छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन व प्रवृत्त केले आहे. त्यामुळे नाना हळदणकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन त्यांची विधान परिषदेवर भंडारी समाजाचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणुक करावी, अशी मागणी अखिल भारतीय भंडारी समाजाने केली आहे, अशी माहिती श्री. मिठबावकर यांनी दिली आहे .
Tags
Maharashtra